बेळगाव -पाऊस नसल्याने धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे जलाशयांच्या पोटात दडलेल्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशय जवळपास कोरडे पडले आहे. त्यामुळे धरणात बुडालेले श्री विठ्ठलाचे देखणे भव्य मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले झाले आहे.
भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिडकल जलाशयाचे बांधकाम सन 1977 मध्ये पूर्ण झाले. तेव्हा हिडकल आणि हुन्नूर ही दोन गावे पाण्याखाली गेली.
त्यावेळी हे विठ्ठल मंदिरदेखील बुडाले. या मंदिराच्या काळ्या दगडांच्या भव्य दर्शनीय भागाचे बांधकाम सुमारे तेराव्या शतकातील प्रख्यात वैशिष्ट्यपूर्ण अशा हेमाडपंथी वास्तुशिल्पकलेने नटलेले होते.
धरण भरले आणि तेव्हापासून हे मंदिर आणि त्यातील विठुराया या जलाशयाच्या पोटात दडला. यंदा पाऊसमान कमी झाल्याने गेल्या आठवड्यात या धरणाने तळ गाठला आणि हळूहळू या मंदिराचे अवशेष दृष्टीक्षेपात आले. तेव्हापासून या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
विशेष म्हणजे, आता 45 वर्षांनंतरही हे मंदिर आणि त्यातील मूर्ती, अन्य स्थापत्य जशास तसे असल्याचे भाविक सांगत आहेत. पाण्यात बुडल्यामुळे कालांतराने मंदिराच्या उंच रचनेच्या बाह्य भिंतींचे नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जलाशयाचे पाणी कमी झाले, की या मंदिराचे कळसदर्शन घडते. मात्र, यंदा संपूर्ण श्री विठ्ठल मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे.