मुंबई – उद्योगपती आणि रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष गौतम सिंघानीया यांनी ते त्यांच्या पत्नी नवाज मोदी यांच्यापासून विभक्त झाल्याची माहिती स्वत: 13 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आता त्यांच्या पत्नीने अर्थात नवाज यांनी सिंघानीया यांच्या संपत्तीतील 75 टक्के वाटा मागितला असल्याची बातमी काही प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. सिंघानीया यांची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर अर्थात 11,620 कोटी रुपये इतकी आहे.
32 वर्षे एकत्र राहिल्यानंतर सिंघानीया आणि त्यांच्या पत्नी वेगळे झाले आहेत. आता नवाज मोदी यांनी त्यांच्या स्वत:साठी आणि मुली निहारिका आणि निशा यांच्यासाठी संपत्तीतील 75 टक्के हिश्श्याची मागणी केली आहे. याचा अर्थ या घटस्फोटासाठी सिंघानीया यांना 8745 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार नवाज यांची ही मागणी सिंघानीया यांनीही मान्य केली आहे.
मात्र, त्यांनी एक अट ठेवली आहे. त्यांनी एक फॅमिली ट्रस्ट तयार करण्याची सूचना केली आहे. त्यांनी कुटुंबाची सगळी संपत्ती अर्थात पैसा आणि अन्य मालमत्ता या ट्रस्टकडे सोपवल्या जाव्यात आणि या ट्रस्टचे केवळ ते एकमेव ट्रस्टी असतील असे सुचवले आहे. गौतम यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना मृत्यूपत्रानुसार ही संपत्ती मिळू शकेल. मात्र, नवाज मोदी यांना हा प्रस्ताव मान्य नसल्याचेही सांगण्यात येते आहे.
दरम्यान, या विषयाच्या संदर्भातील कायद्यांच्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गौतम यांना एकट्याला ट्रस्टचे अध्यक्ष आणि ट्रस्टी होता येणार नाही. ट्रस्ट चालवण्यासाठी त्यात मुख्यत: तीन घटक किंवा पक्ष असतात. त्यातील एक ट्रस्ट सेटलर, एक ट्रस्टी ऍडमिनिस्ट्रेशन हेड असतो तर अन्य एक जण लाभार्थी असतो. एकाच व्यक्तीकडे ही तीनही पदे असू शकत नाहीत.