“घराबाहेर पडा आणि मत द्या, कारण तुम्ही ठरवलं तरच बदल घडू शकेल”; सुबोध भावेचे मतदारांना आवाहन

Subodh Bhave| लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ११ मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. पुण्यात अभिनेता सुबोध भावेने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
“बदल घडला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या. मला राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही. कारण त्याविषयी शून्य आवड आहे. पण मला माहिती आहे हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते मी पार पडलं. त्यामुळे मतदान करा,”असं आवाहन सुबोध भावेने केले आहे.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सुबोध भावेने आवाहन केलं आहे की, “मत द्या. कंटाळा करू नका. मत देण्यासाठी फक्त 5-10 मिनिटे लागतात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली तर जो उमेदवार तुम्हाला अपेक्षित नाही तो उमेदवार निवडून येऊ शकतो. बदल घडला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर घराबाहेर पडा आणि तुमचं मत द्या. जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करतो, कारण तुम्ही ठरवलं तरच बदल घडू शकेल. जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला मत द्या पण मत द्या. मत वाया घालवू नका.”
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता सुबोध भावे याने पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह मतदानाचे कर्तव्य पार पडले. याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.





