पुणे -“गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया…आपला गणपती..शारदा गणपती’ असे म्हणत मंडईकरांचा अमाप उत्साह…ढोल ताशांचा दणदणाट…गणरायावर होणारी फुलांची उधळण अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मंडईच्या श्रींचे आगमन झाले. फुलांनी सजलेल्या ओंकार रथातून पारंपरिक थाटात शारदा गजाननाची आगमन मिरवणूक काढण्यात आली.
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा 130 वे वर्ष आहे. गुरुपरंपरेची महती सांगणाऱ्या स्वामी दरबारात गणरायांची प्रतिष्ठापना झाली. दुपारी 12 .30 वाजता ऍड. पराग एरंडे व अनुराधा एरंडे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, कार्याध्यक्ष अभय थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, देविदास बहिरट, योगेश गोगावले, मदन थोरात, जयंत किराड, ऍड. प्रताप परदेशी उपस्थित होते.
“श्रीं’च्या आगमन मिरवणूक अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक येथून पुन्हा बाबू गेनू चौक मार्गे उत्सव मंडप या मार्गावर काढण्यात आली. यावेळी समर्थ ढोल पथक आणि आवर्तन ढोल पथक ही वाद्य पथके आणि न्यू गंधर्व बॅंड यांनी वादन केले. मिरवणुकीत शारद गणपतींचे आकर्षक रथ सर्वांचे लक्ष वेधून होत होते.