मानवी हस्तक्षेप नसल्याचा चांगला परिणाम
नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागू झाल्याने सर्व माणसे आपापल्या घरातच बंदिस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक वय पशू-पक्षी रिकाम्या झालेल्या रस्त्यांवर मोकाट फिरताना दिसायला लागले आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी वन्य पशूंबाबतचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये दुर्मिळ समजल्या जाणारे अंगावर ठिपके असलेले मलबार मांजराचाही (सिव्हेट) समावेश आहे. हे मांजर शहरी लोकवस्तीमध्ये कधीच आढळत नाही.
सर्वात शेवटी हे रानमांजर 1990 मध्ये बघितले गेले होते. तेंव्हाही अगदी निर्जन रस्त्यावर एकटेच हिंडताना बघितले गेले होते. “आयएफएस’ अधिकारी सुशांत नंदा यांनी केरळमधील कोझिकोडच्या रस्त्यावर मोठ्या ठिपक्यांचे मलबार रानमांजर फिरत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
रानमांजराची ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. अशी केवळ 250 सिव्हेट अस्तित्वात असल्याचा अंदाज आहे. पश्चिम घाट परिसरात रोगांमुळे सिव्हेट लुप्त व्हायला लागले असून कोझ्कोडच्या परिसरात 1990 पासून आताच्या लॉकडाऊन दरम्यान हे दिसलेले नाही, असे नंदा यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी नोएडामधील एक फोटो शेअर केला आहे. त्यात एक नीलगाय रस्त्यावर फिरताना दिसत आहे. डेहरादूनच्या गल्ल्यांमध्ये इकडून तिकडे पळणाऱ्या चितळाचा एक व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे. “आयएफएस’चे अन्य अधिकारी प्रवीण कासवान यांनीही चंदिगडच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या सांबराचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ओडिशातील हृशिकुल्य नदीच्या उगमापाशी रिडले कासवेही बघितली गेली आहेत. या प्रजातीची कासवे अत्यंत दुर्मिळ समजली जात आहेत. 26 मार्चपर्यंत सुमारे 10 हजार कासवे बघितली गेल्याचे नंदा यांनी म्हटले आहे.
मानवी हस्तक्षेप न झाल्यामुळे निसर्गाची प्रगती कशी होईल हे “कोविड-19’च्या साथीमुळे दिसले आहे. अगदी शहरी भागातसुद्धा, सर्व प्रकारचे पक्षी आणि छोट्या सस्तन प्राण्यांना मुक्तपणे संचार करताना बघणे आणि ऐकणे फार आनंददायक आहे, असे पशु हक्क कार्यकर्त्या गौरी मुळीखी यांनी म्हटले आहे. सुमारे 1.3 अब्ज लोकसंख्या असलेला भारत देश लॉकडाऊन झाला आहे. देशभरात 800 जणांना करोनाची बाधा झाली आहे आणि आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.