पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात ये-जा करण्यासाठी मोफत सीएनजी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजपासून सुरू होणारी ही सेवा विद्यापीठ परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांना पोहचण्यात मदत करणार आहे.
विद्यापीठाचा परिसरात मोठा असल्याने स्वतःचे वाहन नसलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी विद्यापीठातर्फे दोन बसेस देण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर जवळपास १३ बस थांबे सुरू करण्यात आले आहे. भविष्यात प्रतिसाद पाहून थांबे वाढवण्यात येणार आहेत.
बस थांबे
दर अर्ध्या तासाने ही बस धावणार आहे. विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयकर ग्रंथालय, रसायनशास्त्र विभाग, परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतिगृह, आरोग्य केंद्र, पुम्बा, मुलांचे वसतिगृह, मुख्य प्रवेशद्वार.
“बससेवेचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे अॅप तयार केले जाणार आहे. ज्यामुळे बस नेमकी कुठे आहे, किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहचेल यांची माहिती वापरकर्त्यांना मिळेल.” – डॉ.सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
“विद्यापीठात आल्यावर विद्यार्थी, नागरिकांना आधी खूप पायपीट करावी लागायची. मात्र, दोन सीएनजी बसेसद्वारे मोफत प्रवास सुरू केला आहे. या इको-फ्रेंडली सेवेचा जास्तीत जास्त लोकांना होईल.” – डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ