पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात परदेशातून आलेल्या आणखी चार जणांमध्ये ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. हे चारही रुग्ण नायजेरिया येथून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना नवीन जिजामाता रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे. असे असले तरी यापूर्वी ओमायक्रॉनची लागण झालेल्या सहा रुग्णांपैकी चार जणांनी या आजारावर मात करत डिस्चार्जही मिळविला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये नायजेरिया या ठिकाणाहून 25 नोव्हेंबरला आलेल्या दोन व्यक्तीचा चाचणी अहवाल 29 नोव्हेंबरला पॉझिटिव्ह आला. तर त्यांच्या संपर्कातील आणखी एकाचा अहवाल 30 तारखेला पॉझिटिव्ह आला.
या तीनही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी तीन रुग्णांचे अहवाल गुरूवारी (दि. 2) पॉझिटिव्ह आला. त्यांच्यामध्ये ओमायक्रॉन हा नवीन व्हेरियंट आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने (स्वॅब) जिनोम सिकव्हेंसिंग करिता राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून या सहाही रुग्णांना ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन व्हेरियंटची लागण झाली असल्याचे समोर आले होते.
आता त्यामध्ये आणखी चार रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आतापर्यंत ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे.
परदेशातून आलेले प्रवासी व त्यांच्या सहवासातील 340 नागरिकांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 160 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.
त्यामध्ये परदेशातून आलेल्या 11 जणांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तर त्याच 11 रुग्णांपैकी 3 जणांना ओमायक्रॉनची बाधा झालेली होती. त्यांच्या संपर्कातील 21 रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी 7 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. असे आतापर्यंत 10 रुग्णांना या नवीन व्हेरियंटची लागण झाली आहे. तर उर्वरित 22 संशयितांचे अहवाल अद्याप बाकी आहे.
यापूर्वी ओमायक्रॉन बाधित असलेल्या सहा रुग्णांची दहाव्या दिवशी पुन्हा करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 4 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यापूर्वी ओमायक्रॉन बाधित असलेल्या सहा रुग्णांची दहाव्या दिवशी पुन्हा करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 4 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.