पिंपरी – महापालिकेकडून गाळे मिळवून देतो, असे सांगून फसवणूक करीत 55 हजार रुपयांची खंडणी घेतली. या प्रकरणी भाजपाचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक (प्रभाग क्रमांक १०) केशव घोळवे यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
केशव घोळवे, गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अली शेख (वय 45, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 2019 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये नेपाळी मार्केट, डेक्कन होंडा शोरूमच्या समोर पिंपरी येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांची नेपाळी मार्केट येथील जागा मेट्रोचा प्रकल्प जात असल्याने त्यांना शासनाकडून पर्यायी जागा एकूण 100 गाळे देण्यात येणार आहे. ही जागा फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांना महापालिकेकडून मिळवून देतो, असे आश्वासन केशव घोळवेंसह इतर आरोपींनी दिले. तसेच भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडून फिर्यादी व इतर व्यापार यांची फसवणूक केली.
तसेच शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून 55 हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर सुद्धा एक लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.