पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत पत्नीचा खून करणार्या पतीला ७ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाने यांनी सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त दोन महिने कारावास भोगावा लागले, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सुदाम नारायण जाधव (वय ३८) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. देवकी जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुनील तपकीर (वय ४५) यांनी फिर्याद दिली होती. १८ ते २० नोव्हेंबर २०१६ रोजी मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे ही घटना घडली होती.
सुदाम हा त्याच्या पत्नीसह भात काढण्याच्या कामासाठी तपकीर यांच्या गावात राहायला आला होता. सुदाम याला दारूचे व्यसन होते. त्याच्यात आणि पत्नीत सतत वाद होत होते. १८ नोव्हेंबर रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सुदाम याने दारूच्या नशेत पत्नीला जबर मारहाण करून तिचा खून केला,
असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील पुष्कर सप्रे आणि एस. के. कोंडे यांनी काम पाहिले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद अॅड. सप्रे, अॅड. कोंडे यांनी केला.
न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तवाद ग्राह्य धरत शिक्षा सुनावली. याप्रकरणी प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक एस. व्ही. निंबाळकर, यू. आर. खाडे, व्ही. एच. पवार यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक विद्याधर निचित यांनी काम पाहिले.