पिंपरी, दि. 24 – चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स, बोर्ड तत्काळ काढा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता समन्वय अधिकारी अस्मिता मोरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिल्या आहेत. तसेच राजकीय फ्लेक्स काढल्यानंतर त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
चिंचवड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 18 जानेवारी रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली असून आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरात काही राजकीय फ्लेक्स अद्याप जैसे थे आहेत. मात्र, आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता समन्वय अधिकारी अस्मिता मोरे यांनी महापालिका आयुक्त सिंह सोमवार (दि.23) रोजी पालिकेला पत्र पाठवून आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील सर्व राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स, बोर्ड तत्काळ काढून त्याचा अहवाल सादर करावा, असेही आयुक्त सिंह यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.