प्रभात वृत्तसेवा पुणे/ मुंबई, दि. 16 – स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी मुंबईतील उरण येथे मध्यरात्री 12 वाजल्यानंतर एक अनोखा सोहळा पार पडला. नौदलातील निवृत्त कमांडोजनी पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन तसेच राष्ट्रगीत सादर केले.
माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी, आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकारला. या विश्वविक्रमी कार्यक्रमात 18 कमांडोनी सहभाग घेतला. सुमारे अर्धा तास पाण्याखाली स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे नागरिकांमध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारी आणि तिरंगा ध्वजाप्रति असलेल्या आदराच्या भावनेचे स्फुल्लिंग चेतविण्याची कामगिरी या निवृत्त नौदल कमांडोजनी पार पाडली. उरणमधील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्वीमिंग पूल येथे हा सोहळा पार पडला. हा सोहळा अनुभवण्याचा अनुभव नागरिकांनी स्क्रीन तसेच ऑनलाइन माध्यमांद्वारे घेतला.
ही “अंडरवॉटर इंडिपेंडेंस सेलिब्रेशन’ची संकल्पना रवी कुलकर्णी यांची आहे. पाण्याखाली निवृत्त कमांडो रवी कुलकर्णी, नंदलाल यादव, रामदास कळसे, ब्रिजभूषण शर्मा, सज्जनसिंग, भूपेंद्र सिंग, विनोद कुमार, रामेश्वर यादव यांनी कमाल दाखवली.
सपोर्टिंग टीममध्ये एन. सी. जगजीवन, विलास भगत, अनिल घाडगे, महेंद्रसिंग, बी. एस. रजपूत, चेतन चांदोरकर, प्रीतम पाटील, करण भोईर, वेंकटेश कोळी, अमित पाटील यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचालन कमांडर प्रवीण तुळपुळे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन आमदार महेश बालदी मित्रमंडळाने केले.