मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर आता ‘इंडियन आयडॉल’ फेम आशिष कुलकर्णीसोबत स्वानंदीचा २३ जुलै रोजी साखरपुडा पार पडला आहे. प्रेमाची कबुली दिल्यानंतर लगेचच स्वानंदीने थेट साखरपुड्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. अखेर स्वानंदी आणि आशीषचा साखरपुडा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे.
स्वानंदी सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो शेअर करत लिहिले की, “अखेर आम्ही एंगेज झालो आहोत”. स्वानंदी आणि आशिषच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर, समीर चौघुले, नम्रता संभेराव, शरयू दाते, श्रेया बुगडे या कलाकार मंडळींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. साखरपुड्यानंतर आता या दोघांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादार’ या सुपरहिट मालिकेनंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गायनाच्या कार्यक्रमाचे स्वानंदीने विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे. तर आशिष कुलकर्णी गायक आणि गीतकार आहे. त्याने 2008 मध्ये झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये आणि 2020 मध्ये इंडियन आयडॉल सीझन 12 मध्ये भाग घेतला होता. याशिवाय त्याने मराठी चित्रपटातील गाणीही गायली आहेत.