इंपाळ, दि. 19 – मणिपूरमध्ये “नॅशनल पीपल्स पार्टी’च्या एका उमेदवाराच्या वडिलांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मणिपूरचे उपमुख्यमंत्री युमनाम जोयकुमार सिंग यांनी ही आज ही माहिती दिली.
आंद्रो मतदारसंघासाठीचे आघाडीचे उमेदवार एल संजोय सिंग यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळच त्यांच्या वडिलांवर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यावेळी संजोय सिंग, त्यांचे वडील आणि काही कार्यकर्ते निवडणुकीसंदर्भात चर्चा करत होते. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात संजोय सिंग यांच्या वडिलांच्या खांद्याला गोळी लागली.
दरम्यान मेघालयचे मुख्यमंत्री आणि “एनपीपी’ चे अध्यक्ष कोनार्ड के संगमा यांनी रुग्णालयात जाऊन संजोय सिंग यांच्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध देखील केला आहे. या हल्ल्यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही संगमा यांनी सांगितले. मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असल्याची चिंताही संगमा यांनी व्यक्त केली.
मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या अशा आणखीन काही घटना घडल्या आहेत. निवडणूका पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडू शकणार नाहीत, हेच या घटनांमधून दिसते आहे. म्हणूनच राज्यात निमलष्करी दलाच्या अधिक तुकड्या तैनात करण्याची मागणी आपण करणार असल्याचेही संगमा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.