पुणे, दि. 30 – बनावट लोन ऍपच्या माध्यमातून धमकावून खंडणी मागणाऱ्या चोरट्यांच्या टोळी देशभरात सक्रीय आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने बंगळुरुत कॉलसेंटरवर छापा टाकून अकरा जणांना अटक केली. त्यानंतर लोन ऍपसाठी बॅंक खात्याचा वापर करणाऱ्या सात जणांना पुण्यातील खराडी, सोलापूर, बंगळुरूतून अटक करण्यात आली. या फसवणुकीत दुबईत वास्तव्यास असलेल्या चिनी नागरिकांची टोळी सामील असल्याची माहिती उघड झाली आहे.
लोनऍप प्रतिनिधींच्या जाचामुळे विमाननगरात तरुणाने आत्महत्या केली. तर वारजेत एका तरुणीने आजीचा खून केला. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लोन ऍपविरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले. पथकाने विविध ठिकाणी छापे टाकले. सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यावेळी उपस्थित होते.
बंगळुरुतील टोळीला बॅंक खात्यांचा तपशील पुरवणे तसेच मजुरांच्या नावाने इंटरनेट बॅंकिंग सुविधा असलेले बॅंक खाते उघडून देणाऱ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि पथकाने ही कारवाई केली. बंगळुरूतील कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी विघ्नेश मंजुनाथ, गणेश सुब्बरायडू, आकाश एम.व्ही., श्रद्धा सुधाकर गौडा, पार्वती संतोष दास, अश्विनी डी. मुरुगन, शिल्पा सुभाष गौडा, प्रिया एस दास, दीपिका एल, सय्यद अकिब पाशा आणि मुबारक अफरोज बेग (सर्व रा. बेंगळुरू ) यांना अटक केली.
या खात्यांचा तपशील बंगळुरूमधील टोळीला पुरवणाऱ्या सात जणांना अटक केली. त्यामध्ये स्वप्नील नागटिळक, श्रीकृष्ण गायकवाड, धीरज पुणेकर, प्रमोद रणशिंग, सॅम्युअल संपतकुमार (सर्व रा. सोलापूर), मुजीब कंदियल, मोहंमद मनीयता (दोघे रा. केरळ ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना दहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीकडून मोबाइल संच, बॅंक खात्यांची कागदपत्रे, एक संगणक, लॅपटॉप, बॅंक खाते पुस्तिका, सीमकार्ड, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, ओळखपत्र जप्त करण्यात
आले आहे, अशी माहिती भाग्यश्री नवटके यांनी दिली.