पुणे, दि. 30 -शहराला सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे अर्धा ते पाऊण तासातच शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. तर वाऱ्यामुळे, पावसामुळे 60 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. त्यात शिवाजीनगर न्यायालयदेखील तासभर अंधारात होते.
भांडारकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, लाल देवळासमोर वाहनांवर झाडे कोसळली. तर, येरवडा परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, अवघे काही मिनिटे झालेल्या या पावसाची नोंद 35 मिमी झाली आहे. येरवडा, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, कर्वे रस्ता, नाना पेठ या भागात रस्त्यांवर पाण्यात चारचाकी वाहने अडकून पडली. ऐन कार्यालये सुटण्याच्या वेळेतच पाऊस आल्याने साचलेले पाणी आणि त्यानंतर वाहतूक कोंडीचा फटका पुणेकरांना सहन करावा लागला आहे. तर झाडे कोसळल्याने अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला.
दरम्यान, पावसाला सुरुवात झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या क्रमांकावरही नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला. त्यानंतर तब्बल दीड ते दोन तास 101 या क्रमांकांवर केवळ
नंबर “बिझी’
असल्याचा मेसेज ऐकायला होता. त्यामुळे अनेकांनी पोलिसांकडे, तर काहींनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करत शहरात घडलेल्या झाडपडी तसेच रस्त्यांवर साठलेल्या पाण्याच्या तक्रारी केल्या. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही या क्रमांकावर संपर्क साधण्यात येत होता. मात्र, त्यांचाही संपर्क होत नसल्याचे सांगण्यात आले.