वॉशिंग्टन – सोशल मिडीया साईट्समध्ये सध्या सर्वात लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपची मालकी मार्क झुकेराच्या फेसबुकला सोडावी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून अमेरिकन न्यायालयात सुरु असलेल्या एका खटल्याच्या निर्णयावर फेसबुकचे भवितव्य अवलंबून असणार आहे. सोशल मिडीयामध्ये एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फेसबुकवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामुले फेसबुकमध्ये गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
अमेरिकेत ग्राहक संरक्षण नियामकांनी (एफटीसी) मार्क झुकेरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील फेसबुक या कंपनीवर “विश्वासघात’ कायद्यांतर्गत खटला दाखल केला आहे. फेसबुकवर सोशल मिडीया मार्केटमधील स्पर्धा संपवण्यासाठी शक्तीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. एफटीसी आणि अमेरिकेतील 52 पैकी 48 राज्यांच्या ऍटर्नी जनरलनी खटल्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर फेसबुकचे शेअर 5% पर्यंत घसरले.
प्रतिस्पर्धी कंपन्यांना खरेदी करून सोशल नेटवर्किंगच्या विश्वात एकाधिकारशाही निर्माण करण्याची फेसबुकची इच्छा असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. फेसबुकने वर्ष 2012 मध्ये इन्स्टाग्रामची 5,362 कोटी रुपयांत आणि 2014 मध्ये 1.65 लाख कोटी रुपयांत व्हॉट्सऍपची खरेदी केली होती. यावरून फेसबुक ही कंपनी सोशल मिडीया क्षेत्रातल्या सर्व स्पर्धकांना हटवून केवळ आपलेच वर्चस्व स्थापित करू इच्छिते हे दिसून येते, असे याचिकेत म्हटले आहे. यापूर्वीही या करारांचे प्रकरण नियामकांसमोर आले होते. मात्र त्यावेळी फेसनुकने या दोन कंपन्या खरेदी केलेल्या नव्हत्या. फेसबुकने या दोन्ही कंपन्या खरेदी केल्यावर ले लक्षात आले की, हे फेसबुकची ही पावले बाजारातील निरोगी स्पर्धेसाठी घातक आहेत.
त्यावर उपाय म्हणून फेसबुकने व्यवसायाचे दोन भागांत विभाजन करावे, अशी एफटीसीची इच्छा आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी उभारलेल्या सोशल मीडियाच्या साम्राज्याच्या अस्तित्वासाठी हा विचार धोकादायक आहे. त्याचे कारण म्हणजे कंपनीचे उत्पन्न इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपद्वारे वाढत आहे आणि त्या बळावर फेसबुक डिजिटल कॉमर्समध्ये उतरत आहे. हे दोन्ही नफा देणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हातातून गेल्यास फेसबुकची लॉंग टर्म व्हॅल्यू संपेल. फेसबुकचे असे विभाजन ही गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी असेल, कारण विलीनीकरणानंतर आताच लाभांश मिळण्यास सुरुवात झाली होती. या वर्षी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपद्वारे ई-कॉमर्समधील दिग्गज होण्याची फेसबुकची इच्छा आहे, ती शक्यता कमी दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, फेसबुकची महसुली वाढ आता थांबेल.