श्रीनगर – गेल्या तीन दिवसांत काश्मीरात गोठणबिंदूच्या खाली घसरलेले किमान तापमान पाहता खोऱ्यातील शाळांना हिवाळी सुट्टी देण्याचा आम्हीं गांभीर्याने विचार करत आहोत असे या संदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असे काश्मीरचे विभागीय आयुक्त व्ही के भिदुरी यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
प्रशासनाला हिवाळी सुट्ट्या जाहीर करणे सोपे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे भिदुरी यांनी सांगितले. या संबंधात एक-दोन दिवसांत औपचारीक घोषणा केली जाईल असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वीच्या पद्धतीनुसार शाळा टप्प्याटप्प्याने बंद केल्या जाण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्रीपासून काश्मीर खोऱ्यातील किमान तापमानात लक्षणीय घसरण झाली असून श्रीनगरमधील पारा शुन्याच्या खाली आला आहे तिथे काल रात्रीचे किमान तापमान उणे 1.8 अंश सेल्सिअस इतके होते. सकाळच्यावेळेत दाट धुकेही पसरत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या खाजगी शाळा संघटनेने खोऱ्यात थंडीची लाट असल्याने खालच्या वर्गासाठी हिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याचा विचार करावा असे सरकारला सांगितले आहे.