पुणे -राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचे नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विलंब शुल्कासह 18 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. बारावीच्या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील श्रेयांक हस्तांतरण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल.
नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 9 जूनपर्यंत, तर विलंब शुल्कासाठी अर्जांसाठी अंतिम मुदत 14 जून होती. अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2023 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट आणि फेब्रुवारी-मार्च अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.