चेन्नई – तामीळनाडूतील नेते ओ. पनीरसेल्वम यांचे बंधू ओ. राजा यांची अद्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची मैत्रिण असलेल्या व्ही.के. शशिकला यांनी काल ओ. राजा यांच्याशी अद्रमुकसी संबंधित घडामोडींबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यमुळे ओ. राजा यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून ओ. राजा यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. अद्रमुकचे समन्वयक पनीरसेल्वम आणि सह समन्वयक पलानीस्वामी यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. शिस्तपालन कारवाईअंतर्गत ओ. राजा यांच्या सारख्या थेनी जिल्ह्यातील अन्य तिघांवरही कारवाई करण्यात आली आहे.
शशिकला यांना काही वर्षांपूर्वीच अद्रमुक पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यांनी कालपासून तामीळनाडूच्या दक्षिणेच्या काही जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी त्यांच्या काही समर्थकांची भेट घेतली. तिरुचेंदूर येथे त्यांनी या समर्थकांची भेट घेतली आणि पक्षाशी संबंधित घडामोडींबाबत चर्चा केली होती.