हिंगोली – घरगुती कारणावरून पत्नीची धारधार शस्त्राने हत्या केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आज आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. शेख सलीम शेख इस्माईल असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शेख याने दि.27 मे 2017 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून पत्नी परवीन बेगम सोबत वाद करून डोक्यावर, गळ्यावर धारधार खंजीराने वार करून तिची हत्या केली होती. शेख आणि परवीन यांच्या मुलाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर झालेल्या तपास आणि न्यायालयीन सुनावणीमध्ये 18 साक्षीदार तपासले गेले, फिर्यादी व इतर साक्षीदाराचा पुरावा व परिस्थितीजन्य पुरावा तसेच आरोपीचा अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी.पालदेवार यांनी आरोपी शेख सलीम इस्माईल (वय 63) यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षाही सुनावली आहे.