पिंपरी – उद्योजक आणि बजाज ऑटोचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे उद्योगनगरीशी एक अतूट नाते होते. शहराचे मतदार असलेले राहुल बजाज यांनी पिंपरी-चिंचवडला उद्योगनगरी आणि ऑटोमोबाइल हब बनविण्यात खूप मोठे खूप योगदान दिले आहे. या शहरात बजाज ऍटोमुळे शेकडो लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योजक व हजारो कामगारांच्या हाताला काम मिळाले.
आकुर्डी येथील बजाज ऍटो कंपनी परिसरात असलेल्या घरात राहुल बजाज यांनी आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ घालविला. ते शहराचे मतदार होते आणि कोणतीही निवडणूक असली तरी आवर्जून मतदानासाठी उपस्थित राहणाऱ्या राहुल बजाज यांची पिंपरी-चिंचवड ही कर्मभूमी ठरली. त्यांच्या कतृत्त्वाचा त्यांच्या कंपनीसोबतच शहरालाही खूप मोठा फायदा झाला. बजाज ऍटोची त्यांनी पाच दशक यशस्वीरित्या धुरा सांभाळली. बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष आदी पदांवर ते कार्यरत होते. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
सामाजिक कार्यात देखील राहुल बजाज हे अग्रेसर राहिले. त्याविषयी माहिती देताना जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे विश्वस्त विनोद देशमुख म्हणाले, मी सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली होती. तेव्हा त्यांच्याशी माझे संबंध आले. ते मोठ्या मनाचे, दिलदार व्यक्ती होते. त्यांचे कार्य अतुलनीय असेच होते.
कामगारांना मिळाली रोजीरोटी
बजाज उद्योग समूहामुळे अनेक कामगारांना रोजीरोटी मिळाली. त्यांच्या निधनामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे विश्वकल्याण कामगार संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले, कामगारांच्या हितासाठी भांडणाऱ्या संघटनांना बजाज यांचा विरोध नव्हता. कंपनीत राहणारे ते एकमेव उद्योजक असावेत. कामगारांना आपले कुटुंब समजून ते राहत. ते राज्यसभेवर निवडून आले त्या वेळी त्यांच्या सत्काराला आम्ही गेलो असताना त्यांनी आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या होत्या, असे थोरात यांनी नमूद केले.
दिलेला शब्द पाळण्यावर भर
उद्योजक राहुल बजाज यांचा दिलेला शब्द पाळण्यावर कायम भर राहिला. कामगारांचे बजाज ऑटोमध्ये विविध लढे झाले. या लढ्यांच्या वेळी कंपनीच्या उत्पादन वाढीवर ते ठाम असत. कामगारांशी त्यांचे चांगले संबंध होते. कामाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. तसेच, कामगारांना वाऱ्यावरही सोडले नाही, असे बजाज ऑटोत कामगार शिक्षक म्हणून 34 वर्ष सेवा केलेल्या पुरुषोत्तम सदाफुले यांनी नमूद केले. त्यांच्या आठवणी सांगताना सदाफुले म्हणाले, कामगारांना प्रशिक्षित केले पाहिजे, अशी बजाज यांची धारणा होती. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि मला कामगार भूषण हा पुरस्कार एकाच वेळी मिळाला. त्या वेळी त्यांनी माझा 51 हजार रुपये देऊन मोठा सन्मान केला होता. मला ते “मास्टरजी’ म्हणत असत. चिंचवड येथील जयश्री थिएटरला ते पत्नीसह आवर्जून चित्रपट पाहायला जात असत.