सातारा – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी ई- बसच्या सेवेचा आढावा घेतला. ही बस सेवा शनिवारपासून कास पठारावर प्रत्यक्षपणे सुरू होत आहे. बस सेवेसाठी पर्यटकांना 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच पर्यटन महामंडळाच्या विभागीय सहाय्यक संचालक सुप्रिया करमरकर दातार आणि कास संवर्धन समितीचे सदस्य यांच्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनामध्ये अर्धा तास बैठक झाली. या बैठकीमध्ये शनिवारपासून तीन बस सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी संग्रहालय परिसरातील चार्जिंग स्टेशनवर बसचे संपूर्णपणे चार्जिंग करण्यात येणार आहे. बारा मीटरची ही बस असून एका चार्जिंगमध्ये ती 280 किलोमीटर धावण्याची क्षमता ठेवते. पर्यटकांना कासाणी ते कास पठार असा ई बसचा प्रवास करता येणार आहे. पर्यटकांना ई- बस सेवेचा शनिवारपासून आनंद घेता येणार आहे.
कास पठाराला गेल्या आठ दिवसांत सुमारे 22 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. पठारावर धावणारी बस हा एक आकर्षणाचा विषय ठरणार आहे. हा प्रायोगिक तत्त्वावरचा प्रकल्प आहे, असे सुप्रिया करमरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी शनिवारी कास पठाराला पुन्हा भेट देण्याची शक्यता आहे.