नवी दिल्ली – अंमलबजावणी संचलनालयाने दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित कंपन्यांच्या चार कोटी 81 लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. या मंत्र्यांवर मनी लॉंड्रींगच्या झालेल्या आरोपाशी संबंधित मालमत्तांवर ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
या मालमत्ता अकिंचन डेव्हलपर्स प्रा. ली; इंडो मेटल्स इम्पेक्स प्रा. ली; प्रयास इन्फोसोल्युशन प्रा. ली; मंगलयतन प्रोजेक्टस् प्रा. ली; आणि जे. जे. आयडियल इस्टेट प्रा. ली. या कंपन्यांच्या या मालमत्ता आहेत. या शिवाय स्वाती जैन, सुशीला जैन, अजित प्रसाद जैन, आणि इंदू जैन यांच्या मालमत्तांवरही टाच आणली आहे. बेहिशेबी संपत्तीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.
जैन यांच्यावर केंद्रीय अन्वेषण पथकाने जैन यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्याखाली 217 पानी एफआयआर नोंदवला आहे. ईडीने केलेल्या तपासात 2015-16 मध्ये लोकप्रतिनिधी असताना वर उल्लेख केलेल्या कंपन्या स्वस्तात ताब्यात घेतल्या. त्यांच्या निवासस्थानाच्या खर्चापोटी 4. 81 कोटी रुपयांच्या नोंदिी बनावट कंपन्यांच्या नावे दाखवून हा पैसा कोलकाता येथील लाभार्थ्याला हवाला मार्फत पाठवण्यात आला. या पैशाचा वापर कर्ज परत फेडीसाठी किंवा दिल्लीच्या सभोवती शेत जमीन खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचे ईडीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जैन यांची ईडीने 2018 मधील प्रकरणात चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना अलीकडेच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. या चार कंपन्यांचे भअगधअरक असताना या चार कंपन्यांकडून मिळालेल्या निधीचा तपशील जैन यांनी दिला नसल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद केले आहे. जैन, त्यांची पत्नी आणि अन्य चार आरोपींवर सीबीआयने या पुर्वी गुन्हा दाखल केला असून सीबीआयने त्यांची यापुर्वी चौकशीही केली आहे.