पुणे – डीआरडीओ संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या तपासात एक ट्विस्ट निर्माण झाले आहे. त्यांनी पाच देशांना भेटी दिल्याचे उघड झाले होते. या परदेश दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानी हेर असलेल्या महिलेची भेट घेतल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यांनी पाचही देशांत केलेले दौरे हे सपत्नीक होते, असे समोर आले आहे. त्यांना गिरीभ्रमणाची (ट्रेकिंग) आवड असून त्यांनी त्याच उद्देशाने संबंधित देशांना भेटी दिल्या आहेत. ते एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरही जाऊन आले आहेत. तर, दुसरीकडे समाजमाध्यमाव्दारे ते पाकिस्तानी गुप्तचर हेरांच्या संपर्कात असल्याचे पुरावे एटीएसच्या हाती आहेत. यामुळे या प्रकरणाचा तपास हा पूर्णत: सोशल मीडियावरील त्यांच्या संपर्कावर आधारित असणार असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. कुरुलकर एटीएसच्या कोठडीत आहेत. पाकिस्तानी हेरांना त्यांनी कोणती माहिती पुरवली, हे जाणून घेण्यासाठी त्यांचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू असतानाच दुसरीकडे “रॉ’ एजन्सीकडूनही त्यांची समांतर चौकशी सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करुन त्यांनी पुण्यातील त्यांच्या कार्यालयातून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हचे (पीआयओ) हस्तक समाजमाध्यमातून त्यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. तपासात ते “हनीट्रॅप’मध्ये अडकल्याने माहिती देत असल्याचे पुढे आले. पदाचा गैरवापर करुन त्यांनी माहिती पुरवली आहे. मात्र, ही माहिती नक्की कशासंदर्भात आहे आणि त्याचा देशाच्या सुरक्षेवर काय परिणाम होऊ शकतो, याची कसून तपासणी केली जात आहे.
त्यांच्या पासपोर्टवरुन त्यांनी पाच देशांचे दौरे केल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी परदेशात पाकिस्तानी हेराची भेट घेतल्याचा तपास यंत्रणांना दाट संशय होता. त्यादृष्टीने तपास यंत्रणांनी त्यांनी भेट दिलेल्या देशासंदर्भात तेथील स्थळांसंदर्भात तपासणी केली. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “डॉ. कुरुलकरांनी चीन, दक्षिण आफ्रिका, केनिया, मॉरिशस, मलेशिया आणि नेपाळचे दौरे राजनैतिक पासपोर्टवर केले आहेत. तपासात त्यांनी तेथे गिरीभ्रमणही केल्याचे समोर आले. ते नेपाळमार्गे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरीही जाऊन आले आहेत. या दरम्यान पाकिस्तानी हेर त्यांना भेटल्याचा संशय होता.