डेहराडून – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासावर उत्तराखंड कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. इतर राज्याच्या राज्यपालांसाठी उत्तराखंड सरकारचे विमान उपलब्ध करणे नियमांना धरून नसल्याचे प्रदेश कॉंग्रेसने म्हटले आहे.
कोश्यारी रविवारी उत्तराखंडमध्ये दाखल झाले. तेथील भाजप सरकारने कोश्यारी यांच्यासाठी विमानाची व्यवस्था केली. त्याबाबत कॉंग्रेस नेत्या गरिमा दसौनी यांनी नापसंती व्यक्त केली.
कोश्यारी यांना सरकारी विमानाने पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. त्यांच्या विमान प्रवासामुळे कर्जाने ग्रासलेल्या उत्तराखंडच्या सरकारी तिजोरीवर आणखी आर्थिक भार पडणार आहे.
उत्तराखंडवर 70 हजार कोटी रूपयांच्या कर्जाचा बोजा आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना त्यांच्या राजकीय मार्गदर्शकाला (कोश्यारी) सुविधा पुरवायच्याच असतील; तर त्या त्यांनी वैयक्तिक खर्चातून पुरवाव्यात. धामी इतर माजी मुख्यमंत्र्यांचाही असाच पाहुणचार करणार का, असा सवालही दसौनी यांनी केला. कोश्यारी हे मूळचे उत्तराखंडचेच रहिवासी असून त्या राज्याचे माजी मुख्यमंत्रीही आहेत.