पुसेगाव – ‘दारू नको, दूध प्या’, ‘३१ ची रात्र दुधाची रात्र’, ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ अशा घोषणा देत आणि रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांना दूध वाटप करत परिवर्तन आणि सर्वोदय सामाजिक संस्था, काटेवाडी यांच्या वतीने ‘नववर्षांचे स्वागत दारू पिऊन नको,’ असा संदेश दिला.
पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांना दारूसारख्या व्यसनापासून दूर ठेवण्याचा हेतूने नववर्षाच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयीन युवक- युवती व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नव्या वर्षाचे स्वागत क्षणभंगुर आणि आरोग्यास घातक अशा दारू प्राशन करून करण्याऐवजी दूध प्रशनाने करा, असा संदेश देत समाजाला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या हेतूने हा अनोखा उपक्रम आयोजित केल्याचे व्यसनमुक्ती तज्ज्ञ किशोर काळोखे यांनी सांगितले.
या वेळी सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदयी, गांधीवादी ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब इनामदार, जयहिंद फाउंडेशन अध्यक्षा हेमलता फडतरे, डॉ. संदीप माळी, भालेराव देशपांडे, धीरज जाधव आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.