मुंबई – ओम राऊत दिग्दर्शित यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र हा चित्रपट रिलीज होण्यापासून वादात सापडला आहे. चित्रपटातील कलाकारांचे वेशभूषा आणि व्हीएफएक्स यावरून हा वाद निर्माण झाला होता. यानंतर आता अभिनेत्री कंगणा राणावतने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नाव न घेता ‘आदिपुरुष’ चित्रपटावर टीका केली आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटावरून कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली आहे. ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये प्रभू रामाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये राम-सीता आणि हनुमान दाखवण्यात आले आहेत. यासोबतच कंगनाने ‘राम का नाम बदनाम ना करो’ हे गाणेही त्या फोटोंवर लावले आहे. हे गीत 1971 मध्ये आलेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील आहे.
कंगनाने या स्टोरीच्या माध्यमातून स्पष्ट उल्लेख न करता ‘आदिपुरुष’ चित्रपटावर टीका केली आहे. याआधी पासून चित्रपटात प्रभू रामाचे लूक पाहून नेटकरी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत, अशातच कंगनाची ही स्टोरी शेअर केली आहे. कंगनाने ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना या स्टोरीद्वारे टोला लगावला आहे.
दरम्यान, या चित्रपटाबाबत नकारात्मक टिपण्णी केली जात असताना देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये 95 करोंड रुपयांचा गल्ला जमवला आहे.