पुणे : वाहन परवान्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरांना स्वत:च अपलोड करावे लागणार आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे डॉक्टरांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांचे कार्य फेसलेस होण्याकरिता मागच्या वर्षी 14 जून 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांकाचा वापर करून शिकाऊ वाहन परवाना देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पण यासाठी लागणारे कागदपत्र प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन जमा करावे लागत होते. पण आता “एनआयसी’ने वैद्यकीय प्रमाणपत्र “एमबीबीएस’ डॉक्टरांद्वारे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्याची प्रक्रिया विकसीत केली असल्यामुळे ते प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन जमा करण्याची आवश्यता नाही.
केंद्रीय मोटार वाहन नियम 5(1) अन्वये नवीन, नूतनीकरण आणि दुय्यम प्रत वाहन परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र (मेडिकल सर्टिफिकेट) देणे बंधनकारक आहे. अनेकजण हे प्रमाणपत्र बनावट वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रमाणपत्र “एमबीबीएस’ डॉक्टरांनीच अपलोड केल्यास बनावट प्रमाणपत्र अपलोड करण्याला आळा बसणार आहे.
काय आहेत प्रक्रिया…
– डॉक्टरांनी “एमबीबीएस’ची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
– डॉक्टरांनी आपल्या क्लिनीकचे चार फोटो, “एमबीबीएस’ पदवी धारण केलेली डिग्री सर्टिफिकेट, महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल – – ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र आणि ओळक पत्र आदी कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. डॉक्टरांना स्वतंत्र यूजर आयडी, पासवर्ड मिळणार आहे.
-डॉक्टरांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करून संबंधित परवानाधारक अर्जदाराची तपासणी करून त्या -अर्जदाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.