पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेखी परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे परीक्षेची बैठक व्यवस्था राहील. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकत आहेत, त्याच महाविद्यालयात परीक्षा होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जवळपास अडीच वर्षांनंतर पुणे विद्यापीठाची लेखी परीक्षा पारंपरिक म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने 20 जूनपासून सुरू होत आहे. या परीक्षेला साधारण 7 लाख विद्यार्थी बसणार आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून परीक्षांसाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लेखी परीक्षांच्या दरम्यान गोंधळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने खबरदारी घेत, परीक्षेची नियमावली प्रसिद्ध केली आहे. या परीक्षांमध्ये एका बाकावर एक विद्यार्थी बसणार असल्याने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. तशी सुविधा नसेल, तर त्या पद्धतीने व्यवस्था करावी, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.
परीक्षा केंद्रांवर बॅग ठेवण्याची, पाण्याची व्यवस्था करावी. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तळमजल्यावर परीक्षेला बसण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेत एखादा विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे. परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी प्रश्नसंच हे पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पॅटर्ननुसार प्रश्नसंच उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते आवश्कतेप्रमाणे डाऊनलोड करता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली
विद्यार्थ्यांनी समकक्ष विषय जाणून घेऊन त्याप्रमाणे परीक्षेला सामोरे जावे. काही प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार आहे. त्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली. सर्व अभ्यासक्रमांचे परीक्षांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहितीही परीक्षा विभागाने दिली आहे.