पुणे, दि. 15 -यंदाचा दिवाळसण व्यापारी आणि किरकोळ व्यावसायिकांच्या दृष्टीने आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे. गेल्या आठवड्यापासून पुण्यातील बाजारपेठ चांगलीच बहरली असून त्याचे दृश्य शनिवारी दिसून आले. त्यात पावसानेही उघडीप देत या खरेदी अन् उलाढालीच्या उत्साहाला जणू साथच दिली; अन् शहरातील सर्वच बाजारपेठा तुडुंब भरल्या अन् बहरल्यादेखील. यामुळे व्यापाऱ्यांतही आनंदाचे वातावरण असून आणखी आठवडाभर हा उत्साह असाच वाढत जाणार आहे.
मागील वर्षीच्या दिवाळीत करोनाची भीती बऱ्याच अंशी कमी झाली होती. पण, गर्दी करण्याचे नागरिक टाळत होते. त्यानंतर आता मात्र हे संकट पूर्णपणे टळले असून, इतर सर्वच सणांप्रमाणे पुणेकरांनी यंदाची दिवाळी दणक्यात साजरी करण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, मध्येच येणाऱ्या पावसामुळे या उत्साहात थोड्या अडचणी आल्या. मात्र, शुक्रवारी तडाखा दिलेल्या पावसाने शनिवारी पूर्णपणे विश्रांती घेतली. त्यामुळे पुणेकरांनी शनिवारी सारा शीण घालवत दणक्यात खरेदी केली. शनिवारी प्रामुख्याने लक्ष्मी रस्ता,तुळशीबाग, मंडई, कुंभारवाडा, रविवार पेठ, बोहरी आळी या भागांत प्रचंड गर्दी झाली होती. काही दुकानांमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नव्हती.
इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मार्केट जोरात
दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाजारात मोठी उलाढाल होण्याचा अंदाज आहे. यात लॅपटॉप, मोबाइल यांसह टीव्ही अशा वस्तूंची उलाढाल होत आहे. काही ठिकाणी वस्तूंचे बुकिंग करण्यात आले असून, दिवाळीच्या मुहुर्तावर या वस्तू घरी नेण्याचे नियोजन ग्राहकांनी केले आहे. तर, घरगुती वापराच्या रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, घरगुती पीठ गिरणी अशा वस्तूंना मागणी कायम आहे.