सातारा -करोनाच्या संकटामुळे अनेक जण बेरोजगार झाले असून अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. या संकटात सामाजिक बांधिलकीतून सातारा जिल्हा बॅंकेने स्व. व्ही. डी. सावरकर स्वयंरोजगार सहकारी संस्थेच्या साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक अन्नधान्याची किटस् दिली आहेत, असे प्रतिपादन बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
या किटचे वितरण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. संचालक प्रकाश बडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, लॉकडाऊनमध्ये जिल्हा बॅंकेने सामाजिक बांधिलकीतून 17 हजार 500 किटस्चे वितरण जिल्ह्यातील शेतमजूर, कामगार, दारिद्य्ररेषेखालील यादीत नाव समाविष्ट नसलेल्या आणि सरकारकडून कोणत्याही प्रकारचे रेशन न मिळालेल्या गरजू कुटुंबाना केले आहे. किटमध्ये तेल, तांदूळ, साखर, तांदूळ, चटणी, हळद, गहू आटा इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून त्यासाठी बॅंकने एक कोटी रुपये खर्च केले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटीची मदत केली आहे. या व्यतिरिक्त बॅंकेच्या संचालकांचा सभा भत्ता, अधिकारी व सेवकांचे एक दिवसाचे वेतन मिळून 16 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली आहे.
डॉ. सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा बॅंक देशातील जिल्हा बॅंकांमध्ये अग्रगण्य आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बॅंकेच्या शाखा व मुख्य कार्यालयात आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. सेवकांना मास्क, सॅनिटायझर, ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण, पाणी, सॅनिटायझर आदी सुविधा दिली आहे. शासनाच्या सूचनांची बॅंक प्रभावी अंमलबजावणी करत असून ग्राहकांमध्ये जागृती केली आहे. जिल्ह्यात बॅंकेची 47 एटीएम असून 650 मायक्रो एटीएमद्वारे दुर्गम भागातील ग्राहकांना घरपोच बॅंकिंग सेवा दिली जात आहे. ग्राहकांनी बॅंकेच्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊन शाखांमधील गर्दी कमी करावी.