नगर – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. या निकालात नगर जिल्ह्याचा निकाल 93.66 टक्के लागला असून, पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल दुसऱ्या क्रमांकाचा आहे. तर सोलापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक (94.59 टक्के) मिळविला असून, पुणे जिल्हा गतवर्षीप्रमाणे या वर्षीही तिसऱ्या क्रमांकावर (92.66 टक्के) आहे.
नगर जिल्ह्यात 61 हजार 342 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते.त्यापैकी 57 हजार 456 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 3 हजार 886 विद्यार्थी नापास झाले आहे. पास होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण 96.30 टक्के तर मुलांचे प्रमाण 91.75 टक्के एवढे आहे. जिल्ह्याचा विज्ञान विषयाचा निकाल 97.61, कला शाखेचा 85.06, वाणिज्य शाखेचा 94.48 टक्के लागला आहे.
यावर्षी शेवगाव तालुका प्रथम
बारावीच्या परीक्षेच्या निकालात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही शेवगाव तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे. शेवगावचा निकाल 98.06 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ कर्जत- 97.21, जामखेड – 96.00, पारनेर 93.92, नगर- 95.08, नेवासा – 93.83, अकोले – 89.41, कोपरगाव – 94.95, पाथर्डी – 92.21, राहाता – 92.02, राहुरी – 92.23, संगमनेर – 92.71, श्रीगोंदा – 93.04, श्रीरामपूर – 89.98 टक्के निकाल लागला आहे.