मुंबई – दहावी-बारावीच्या निकालाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. तर, 10 जूनपर्यंत दहावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षण वर्ग, शिक्षकेतर वर्गाने संप पुकारला होता. यामुळे सर्व काम ठप्प झाले होते. याचा परिणाम दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर होण्याची चिंता निर्माण झाली होती. मात्र आता दहावी-बारावीचे निकाल वेळेतच लागणार आहेत. सात दिवसांचा संप मागे घेतल्यानंतर शिक्षकांनी हे काम हाती घेतले. त्यामुळे ते वेळेतच पूर्ण केले जाणार आहे.
बारावीचे निकाल लागल्यानंतर आठवड्याभराच्या कालावधीत दहावीचेही निकाल लागणार आहेत. त्यानंतर लगेच महाविद्यालयीन प्रवेश आणि पदवी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहेत. त्यामुळे संपाचा विद्यार्थ्यांच्या पुढील प्रक्रियावर परिणाम होणार नसून त्या वेळेतच पूर्ण केल्या जातील.
दरम्यान, बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 आणि दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आली होती. यंदा कॉपी मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी कठोर नियम जाहीर करण्यात आले होते. मात्र तरीही अनेक ठिकाणी कॉपीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली होती.