प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – गणेशोत्सवाची मिरवणूक यंदा विसर्जन वेळेसोबतच एका वेगळ्या चर्चेनेही रंगली. ही चर्चा होती, भाजपने 2024 चा लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी सुरू केलेल्या “मिशन बारामती 2024’ची. गणेश विसर्जनाच्या काही दिवस आधीच या मोहिमेची सुरुवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यानंतर राजकीय वातावरण तापले असून त्याचा प्रत्यय विसर्जनादिवशी आला. पुण्यात मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपवर खोचक टीका केली.
अशा कितीतरी लाटा पाहिल्या..
भाजपच्या मिशन बारामती मोहिमेचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक शब्दांत समाचार घेतला. “असे खूपजण येतात आणि आम्हाला लक्ष्य करतात. आम्हाला काही फरक पडत नाही. गेल्या 55 वर्षांत बारामतीत किती जण आले अन् गेले. अशा खूप लाटा मी पाहिलेल्या आहेत. तर बारामतीकरांना खूप चांगलं माहिती आहे, की कुणाचं बटन कसे दाबायचे ते. या निवडणुकीतही ते आपले काम बजावतील याबाबत मला तीळमात्रही शंका नाही,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
…तिथं विचारांचा विजय होतो : रोहित पवार
“बारामतीच्या लोकांवर आमचा विश्वास आहे. बारामतीकर विचार करूनच मतदान करतात. त्यामुळे विजय कोणाचा होतो, ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तिथं विचारांचा विजय होतो,’ असे सांगत आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या मिशन बारामतीवर आपली भूमिका मांडत बारामतीत पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खासदार होणार हे स्पष्ट केले.