पॅरिस : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या कथित ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद आणखी चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. रशियाने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत युक्रेनवर आरोप केला तर दुसरीकडे युक्रेनकडून या हल्ल्याशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. या सगळ्या घडामोडीत आता रशियाकडून थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना संपवण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या क्रेमलिन येथील निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याचा दावा केला. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर लागलीच व्हायरल होऊ लागली. हा हल्ला युक्रेननं केल्याचा दावा रशियानं केला आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, रशियन सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून थेट अण्वस्र हल्ल्याची भीती रशियाकडून घालण्यात येत आहे.
The Kremlin under a drone attack.
Something tells me that Putin’s three-days-long walk in the park to seize Kyiv is not going very well. pic.twitter.com/QiRvUPeVbM— Illia Ponomarenko 🇺🇦 (@IAPonomarenko) May 3, 2023
एकीकडे युक्रेनने रशियातील हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही आता थेट अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनाच संपवण्याची भाषा रशियाकडून करण्यात आली आहे. “या दहशतवादी हल्ल्यानंतर आता झेलेन्स्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आता झेलेन्स्कींना बिनशर्त शरणागती पत्करण्याच्या करारपत्रावर सही करण्याचीही गरज नाही”, अशा शब्दांत रशियाचे माजी अध्यक्ष आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी युक्रेनला जाहीर इशारा दिला आहे.