कराड -बहुतेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. मात्र, कृष्णा साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी गेल्या तीन महिन्यांपासून उर्वरित 430 रूपयांची रक्कम अजूनही दिली नाही. अडीच महिने झाले तरी ठेवीवरील व्याजाचे बील दिलेले नाही. अध्यक्षांनी स्वतः जाहीर केलेले एफआरपी व अधिकचे 200 रूपये तातडीने सभासदांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व संचालक अविनाश मोहिते यांनी केली आहे.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणूक निकालाचा एवढा राग मनात धरून सभासदांच्यावर आर्थिक सूड उगविणे योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी पत्रकात लगावला आहे. पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा साखर कारखान्याची गेल्या हंगामातील एफआरपी 2,930 च्या जवळपास आहे. कारखान्याने ही एफआरपी एकरकमी द्यायला हवी होती. मात्र 2500 रूपये दिले. उर्वरित 424 ते 430 रूपयांच्या दरम्यानची रक्कम अजूनही दिली नाही. हंगाम सुरू होताना एफआरपी व अधिकचे दोनशे रूपये याबद्दल चकार शब्द काढला जात नाही.
या संदर्भात संचालकांनी दीड महिन्यांपूर्वीच कारखाना प्रशासनाला पत्र दिले आहे. कारखान्याकडे भरपूर साखर शिल्लक आहे. को- जनरेशन आणि डिस्टिलरीचे उत्पन्न आहे. तरीही सभासदांना वेळेत एफआरपी आणि कबुल केलेले जादाचे 200 रूपये मिळालेले नाहीत. ठेवीवरील व्याज पूर्वी एप्रिल महिन्यात सभासदांच्या खात्यावर जमा केले जात होते. जून महिना संपत आला तरी व्याजबिलाचा पत्ता नाही.
करोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आहे. खरीप हंगामासाठी सभासदांना पैशाची आवश्यकता आहे. मात्र, सभासदांच्या हक्काचे बिल त्यांना वेळेत मिळत नाही. याउलट परिसरातील इतर साखर कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा केली आहे. एवढेच काय कराड तालुक्यातील खासगी साखर कारखानेही ऊस उत्पादकांची देणी देत आहे. मात्र, कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित राहवे लागत आहे.
कायद्याने लॉकडाऊनच्या काळातील पगार देणे बंधनकारक असताना कारखान्याने परिपत्रक काढून कामगारांची सेवा खंडीत केली. त्यांना पगार दिलेला नाही. कामगार हे सभासदच आहेत. त्यांची कोट्यवधींची कायदेशीर देणी दिलेली नाहीत. कारखान्यांच्या अध्यक्षांनी तातडीने कार्यवाही करून संपूर्ण देय एफआरपी अधिकचे दोनशे रूपये द्यावेत. आता ऊसबिलाचे तुकडे पाडू नयेत, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.