अहमदाबाद – गुजरात राज्यात अनेक ठिकाणी मादक द्रव्यांचे मोठे साठे सापडत आहेत. याच्या तपासात सरकारी यंत्रणांकडून ढिलाई सुरू असून या प्रकाराची न्यायालयाच्या देखरेखे खाली चौकशी केली जावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधिशांच्या देखरेखेखाली ही चौकशी व्हावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन सादर केले.
गुजरातच्या मुंद्रा बंदरात तब्बल तीन हजार किलोचा हेरॉईनचा साठा सापडला होता. त्याच्या तपासाची काहींच माहिती अजून उपलब्ध झालेली नाही असे या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यात गुजरातेत जे मादक द्रव्यांचे साठे सापडले आहेत त्याची किंमत हजारो कोटी रूपये इतकी आहे. पण त्यावर कोणतीच प्रभावी कारवाई होताना दिसत नाही असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.
मादकद्रव्यांचा जो चोरटा व्यापार गुजरातेत मोठ्या प्रमाणात सुरू आहे तो चालवणाऱ्या रॅकेटशी सरकारमधीलच काही लोकांचे लागेबांधे असले पाहिजेत असा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. गुजरात मध्ये कॉलेजच्या परिसरात मादक द्रव्याची खुलेआम विक्री सुरू आहे त्यावर कठोर कारवाई करून तरूणांना या व्यसनापासून वाचवण्याची तातडीची गरजही राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.