Delhi Liquor Policy Scam – आम आदमी पार्टीचा माध्यम प्रभारी विजय नायर हा आपल्याला नाही तर सौैरभ भारद्वाज आणि आतिशी यांना रिपोर्टींग करत होता असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याचा दावा ईडीने आज सुनावणीच्या वेळी केला. त्यावरून भारतीय जनता पार्टीने केजरीवाल यांना लक्ष्य केले असून केजरीवालच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप भाजपने केला.
केजरीवाल तपासात सहकार्य करत नसून गोलगोल उत्तरे देत आहेत. ते तपासाशी संबंधित माहिती लपवत असल्याचे ईडीने सुनावणीच्या वेळी सांगितले. तसेच पक्षाचे कम्युनिकेशन विभागाचे प्रभारी विजय नायर आतिशी आणि भारद्वाज यांच्या संपर्कात होते. आपले त्याच्याशी बोलणे मर्यादीत काळापूरते होते असेही केजरीवालांनी सांगितल्याचे ईडीने म्हटले.
तसेच आपण मंत्र्यांसाठी असलेल्या बंगल्यात राहीलो होतो आणि केजरीवाल यांच्या कार्यालयात काम केल्याचे नायरने दिलेल्या जबाबात म्हटले असल्याकडे ईडीने न्यायालयाचे लक्ष वेधले. एन. डी. गुप्ता यांच्याबाबत विचारल्यावरही केजरीवाल यांनी विसंगत उत्तरे दिली. ईडी म्हणाली की अगोदर पक्षाचे काम पाहणारे एक वरिष्ठ नेता म्हणून गुप्ता यांना केजरीवाल यांनी ओळखले. मात्र कथित घोटाळ्यातील आपल्या सहभागाच्या संदर्भात एका जबाबावर ते नंतर मागे हटले.
आतिशी गौप्यस्फोट करणार
आज या प्रकरणात आपले नाव आल्यानंतर आतिशी यांनीही त्या उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी एक मोठा धमाकेदार गौप्यस्फोट करणार असल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मद्य धोरण प्रकरणात पहिल्यांदाच आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे आल्यामुळे तेही न्यायालयात स्तब्ध झाल्याचे सांगण्यात आले. जेंव्हा नाव आले तेंव्हा भारद्वाज यांनी शेजारी बसलेल्या सुनीता केजरीवाल यांच्याकडे पाहिले आणि ते अत्यंत चकित झाल्यसारखे दिसत होते. त्यानंतर आता आतिशी यांनी उद्या त्या धमाका करणार असल्याचे म्हटल्यावर हा धमाका नेमका कोणावर होणार आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.