पुणे -दहशहतवादी कारवायांच्या तयारीसाठी वापरण्यात आलेली कोंढवा येथील ब्ल्यू बेल्स ही शाळा अनधिकृत आढळून आली. त्यानंतर जाग आलेल्या शिक्षण विभागाने पुणे विभागातील महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रामुख्याने शाळांच्या मान्यतांची पडताळणी करण्यात येणार आहे.
केंद्रीय तपास संस्थेने ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले सील केल्यानंतर शालेय शिक्षण विभागालाही कारवाई करण्यासाठीची जाग आली. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचे मान्यतापत्र तपासले. त्यावेळी संबंधित मान्यतापत्राची पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात नोंदच नसल्याचे समोर आले. मान्यतापत्रावर तत्कालीन शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांची स्वाक्षरीही बनावट असल्याचे आढळले.
सेवा फाउंडेशनने सन 2019 मध्ये ब्ल्यू बेल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सुरू केले होते. राज्यात सीबीएसईच्या 1 हजार 300 शाळांच्या “एनओसी’ तपासण्यात आल्या. यात सुमारे 800 शाळांची कागदपत्रे संशयास्पद आढळून आली. काही शाळांच्या “एनओसी’ही बोगस आढळून आलेल्या आहेत. आता ब्लू बेल्स शाळेच्या स्वरुपात महाराष्ट्र बोर्डाचे मान्यतापत्र बोगस सापडले आहे.
पुण्यात 300 शाळा
पुण्यात महाराष्ट्र बोर्डाच्या 300 स्वयंअर्थसहाय्यित शाळा असून या सर्वच शाळांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. आणखी काही शाळांकडील मान्यतापत्र बोगस असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.