पुणे – भावाबहिणीचे बंध अधिक अतूट करणारा सण “रक्षाबंधन’! येत्या बुधवारी हा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठांमध्ये गजबजाट दिसून येत आहे. राख्यांचे स्टॉल तर आहेतच; परंतु गिफ्ट आर्टिकल्सचीही चहलपहल बाजारांत दिसून येत आहे. छोट्या वस्तू, साडी, ड्रेस यापासून ते सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने येथपर्यंतच्या वस्तुंनी सध्या बाजारपेठा फुलल्या आहेत.
राखी बांधण्यासाठी कोणताही मुहूर्त नाही. काही जणांना “वर्किंग डे’ असल्याने आपल्या सोयीनुसार सकाळी-संध्याकाळी रक्षाबंधनाचा कार्यक्रमाचे आयोजन अनेकांनी केले आहे. हाच मुहूर्त साधून काहींनी सत्यनारायण महापूजेचे आयोजनही केल्याचे दिसून येत आहे. हल्ली सगळी भावंडे कुटुंबासह एकत्र जमून एकाच कोणाच्या तरी घरी सण साजरा करताना दिसत आहेत. यामुळे एकप्रकारे “गेटटुगेदर’ही होते आणि प्रत्येकाकडे वेगळे जाण्याची तसदीही घ्यावी लागत नाही. अशा कार्यक्रमांमध्ये छोटी भावंडेही एकत्र वेळ घालवून “एन्जॉय’ करतात. दरवर्षी एकाकडे हा प्रोग्राम ठरवला जातो.
असंख्य “व्हरायटी’ आणि रंग
पूर्वी एक गोंडा असलेला साधा धागा बांधला जात असे. मात्र आता या राख्यांमध्ये असंख्य “व्हरायटी’ आणि रंग पहायला मिळतात. एखाद्या होलसेल मार्केटमध्ये गेल्यानंतर राख्यांचे प्रकार पाहून, “कन्फ्यूज’ व्हायला नाही झाले तरच नवल. लाल, पिवळ्या, जांभळ्या अशा गडद रंगातील वेगवेगळ्या प्रकाराने बनवलेल्या राख्या पहायला मिळतात.
हल्ली अनेकजण वर्षभर हातातून राखी काढत नाहीत. त्यांच्यासाठीही खास मण्यांच्या, रुद्राक्षाच्या राख्या बाजारात आल्या आहेत. लहानमुलांसाठी त्यांच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टच्या राख्या आहेतच परंतु घरगुती पद्धतीने बनवलेल्या चॉकलेटच्या राख्या खास आकर्षण ठरत आहेत. “मेड टू ऑर्डर’ अशाप्रकारे या राख्या उपलब्ध करून दिल्या जातात.