नवी दिल्ली – शिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख दहशदवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर करत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, दहशतवादी जीएस पन्नू व्हिडिओमध्ये शाह आणि जयशंकर यांच्यावर खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंग निज्जरला ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप करत आहे. यासोबतच हा दहशतवादी अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्या परदेश प्रवासाबाबत माहिती देणाऱ्याला 125,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केला आहे.
गुरपतवंत सिंग पन्नू गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय एजन्सींच्या निशाण्यावर आहे. पन्नूचे नाव बेकायदेशीर काम (प्रतिबंध) कायद्यांतर्गत राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) वाँटेड यादीत घोषित केले आहे. कॅनडात दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या झाल्यापासून खलिस्तानशी संबंधित अनेक लोक यासाठी भारतीय राजकारणी आणि उच्चायुक्तांवर आरोप करत आहेत. निज्जरची गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
शिख फॉर जस्टिस (SFJ) या खलिस्तानी संघटनेने पुन्हा एकदा भारतीय उच्चायुक्तालय आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या घरांना घेराव घालण्याची घोषणा केली आहे. SFJ ने 15 ऑगस्ट रोजी ओटावा, टोरंटो आणि व्हँकुव्हर येथे खलिस्तान समर्थक मेळाव्याचे आवाहन केले आहे आणि 10 सप्टेंबर रोजी व्हँकुव्हरमध्ये मोठ्या प्रमाणात शीख सार्वमत घेण्याची घोषणा केली आहे.
गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर झाल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवली जात आहे. याकडे भारतीय नेत्यांना उघड धोका म्हणून पाहिले जात आहे.