पारगाव – दौंड आणि हवेली तालुक्यातील महसूल विभागासंबंधित विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार राहुल कुल यांनी विविध मागण्यांबाबत चर्चा केली. दौंड तालुका स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू करण्याबाबत हरकती आणि सूचना मागविण्याचा प्रस्तावास मान्यता मिळावी अशी मागणी त्यांनी केली आणि याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले.
या बैठकीस मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सहसचिव रमेश चव्हाण, श्रीराम यादव, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, प्रांताधिकारी पुणे संजय आसवले, प्रांताधिकारी दौंड-पुरंदर मिनाज मुल्ला, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, संचालक रोहीदास उंद्रे, गणेश घुले, सुदर्शन चौधरी, स्वप्निल उंद्रे, भाजप दौंड तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, शाहू भोसले उपस्थित होते.
भामा आसखेडच्या लाभक्षेत्रातून वगळलेल्या परंतु पुनर्वसनासाठी राखीव करण्यात आलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या 7/12 वरील “राखीव’ हा शेरा काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करून, बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे अंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर बाजार समिती आवार, मांजरी उपबाजार समिती पार्किंग, तसेच पेरणे उपबाजार आवाराकरिता महसूल विभागाची जागा मिळावी, अशी मागणी आमदार कुल यांनी केली. त्यानुसार उपलब्ध असलेल्या जागांचे परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात यावेत, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
खानोटाच्या पुनर्वसनाबाबत विशेष सूचना
उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून, उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन आणि पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी कुल यांनी केली. याबाबत पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी प्रांत व तहसीलदार यांच्यासमवेत बैठक घेऊन, स्थळ पाहणी करून आवश्यक त्या जागेचे प्रस्ताव पाठवावेत आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी, असेही निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत.