वॉशिंग्टन : अमेरिकेतील मिसिसीपी प्रांताला रविवारी बसलेल्या चक्रिवादळाच्या तडाख्यामध्ये किमान 6 जणांचा मृत्यू झाला. या चक्रिवादळामुळे मिसिसीपी प्रांतात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या चक्रिवादळामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे अमेरिकेतील स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे. “नॅशनल वेदर सर्व्हिस’ने तातडीने या वादळासंदर्भात धोक्याचा सर्वोच्च इशारा जारी केला आहे.
गव्हर्नल टेल रिव्हज यांनी ट्विटरवरून धोक्याचा इशारा जारी करताना मिसिसीपीतील नागरिकांना सावध केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व पर्यायांचा अवलंब केला जात असून वादळात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या जात असल्याचेही गव्हर्नरनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मरण पावलेले सहाही जण मिसिसीपी प्रांततील दक्षिणेकडील रहिवासी असल्याचे “द मिसिसीपी इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी’ने म्हटले आहे. या वादळामुळे सोमवारी रात्री संपूर्ण मिसिसीपी आणि शेजारील अल्बामा आणि जॉर्जियामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसापूर्वी धुळीचे वादळ घोंघावण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नाक, तोंड आणि डोळे कापडाने झाकून घ्यावेत. तसेच करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून दूरच रहावे, असेही गव्हर्नर रिव्हज यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.