पुणे – मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आठवड्याभरात लॉटरी काढण्यात येणार आहे. नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. प्रवेशासाठीच्या लॉटरीबाबत पालकांना उत्सुकता लागली आहे.
वंचित व दुर्बल घटकातील बालकांना “आरटीई’ अंतर्गत मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. “आरटीई’ प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून शुल्क प्रतिपुर्तीची रक्कम अदा करण्याची तरतूदही करण्यात येत असते. प्रती विद्यार्थी 17 हजार 670 रुपये याप्रमाणे शुल्क प्रतिपूर्ती करण्याचा दरही शासनास्तरावरुन निश्चित करण्यात येतो. आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या शाळांनाच शुल्क प्रतिपूर्ती देण्यात यावी याबाबत शासनाकडून आदेशही जारी करण्यात येतात.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष शैक्षणिक व्यवस्थेची घडीच विस्कटली होती. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक कार्य सुरळीतपुणे सुरू झालेले आहे. “आरटीई’ प्रवेशासाठी बालकाचे वयही निश्चित करुन देण्यात आले असून, त्यानुसार त्यांना प्रवेश इयत्तेत मिळणार आहे. “आरटीई’ अंतर्गत इयत्ता आठवी पर्यंत सुविधांचा लाभ मिळतो. शाळांची भरमसाठ शुल्क भरणे शक्य होत नसल्याने पालकही आपल्या बालकाला “आरटीई’ अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी धडपड करतात. सन 2023-23 या शैक्षणिक वर्षाकरीता “आरटीई’ प्रवेशाच्या अर्ज नोंदणीची संख्या साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. ही अर्ज नोंदणी विक्रमी ठरली आहे. आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरुन “आरटीई’ प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी नियोजनही सुरू आहे.
आठवड्याभरात लॉटरीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन घेणे, शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करणे याबाबत वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान कागदपत्रांमध्ये बोगसगिरी करुन प्रवेश मिळविण्याच्या प्रकारांनाही आळा घालण्यासाठीचे मोठे आव्हान शिक्षण विभागापुढे उभे आहे.
“आरटीई’ प्रवेश तपशील