पुणे – राज्यातील मराठा समाजासह, ओबीसी आणि इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपणाचे निकष राज्य मागासवर्ग आयोगाने गुरुवारी निश्चित केले. सुमारे 20 निकषांच्या आधारे राज्यभरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. येत्या दहा-बारा दिवसांतच सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. राज्य मागासवर्ग आयोगाची दुसरी बैठक गुरुवारी पुण्यात झाली. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाला देखील सर्वेक्षण करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होऊन सर्वेक्षणासाठीचे निकष निश्चित करण्यात आले. यामध्ये मराठा समाजासह ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींमधील मागासलेपणा बरोबरच इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपण तपासले जाणार आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली. मराठा ओबीसी भटके विमुक्त आणि खुल्या प्रवर्गातील सर्व जाती घटकांचे सर्वेक्षण करताना त्यासाठीचे निकष एकसमान असतील तसेच या सर्वेक्षणासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आयोगाच्या बैठकीतील निर्णय
- मराठा ओबीसी आणि भटके विमुक्त यांच्याबरोबरच खुल्या प्रवर्गातील जातींच्या समाज घटकांचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण
- सर्व समाज घटकांचे सामाजिक शैक्षणिक आणि मागासलेपण मोजण्यासाठी निकष एकच असणार आयोगाने निश्चित केलेल्या निकषानुसार प्रश्नावली तयार करून दहा-बारा दिवसांत सर्वेक्षणाला सुरुवात
- घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण होणार त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेणार
- सर्वेक्षणाच्या कामासाठी जिओ टॅगिंग वापरणार