कोपरगाव, (प्रतिनिधी): समता लिक्विडिटी बेस्ड स्कीम अंतर्गत ठेवीदारांच्या १०० टक्के ठेवी सुरक्षित असून, संस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी संस्थेचे सभासद, ठेवीदारांशी जपलेली विश्वासार्हता आणि संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये असलेल्या त्यांच्या योगदानामुळे मी समता पतसंस्था आणि सुधन गोल्ड लोनच नाही तर समता परिवारासोबत जोडला गेलो असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेने १०० कोटी रुपये ठेवी व २५ कोटी रुपये सोनेतारण कर्ज उद्दिष्टपूर्तीबद्दल अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहाता व शिर्डी शाखेच्या ग्राहकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अनासपुरे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रल्हाद दंडवते, सतीश वैजापूरकर, लता डांगे, मुकुंद सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, दिलीप गाडेकर, रघुनाथ बोठे, अनिल पिपाडा, देविदास मते, संजय घाडगे, सोपान सदाफळ या राहाता व शिर्डी शाखेच्या ग्राहकांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून ‘समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम’ विषयी सविस्तर माहिती देऊन दिली. समताने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असल्याचे सांगत संस्था १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणार आहे. समताने सुधन गोल्ड लोन द्वारा सोनेतारण कर्ज वाटप करून नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहे. प्रामाणिकपणे सेवा देऊन इतर कर्ज देणाऱ्या कंपन्यांपेक्षा सोनेतारण कर्जदारांची १३० कोटी रुपयांची बचत केली आहे.
अध्यक्षीय मनोगतात काका कोयटे म्हणाले की, समतात सभासद, ग्राहकांनी ठेवलेले पैसे आमचे नसून ठेवीदारांचे, सभासदांचे आहे. त्या पैशांना पूर्णपणे संरक्षण दिले पाहिजे. ही आमची जबाबदारी असून ती आम्ही पूर्णपणे सांभाळत आहोत. पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवींना १०० टक्के संरक्षण देता येते. हे समताने सिद्ध केले असून एक आदर्श महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळी समोर ठेवला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले . या वेळी भाजप नेते राजेंद्र पिपाडा, माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा, मल्टीस्टेट फेडरेशन संचालक शिवाजी कपाळे, साई आदर्श पतसंस्था चेअरमन संगीता कपाळे, राहाता फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, उपाध्यक्ष साहेबराव निदाने, राहाता पीपल्स अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, साई अरिहंत पतसंस्था चेअरमन सतीश गंगवाल, साई नागरी पतसंस्था चेअरमन अशोक कोते, साई संस्थान को-ऑप क्रेडिट सोसायटी चेअरमन विठ्ठलराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन कापसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.