पिंपरी – करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरामध्ये शनिवारी (दि. 16) लसीकरणास सुरूवात होणार आहे. त्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. ही लस आरोग्य सेवा देणारे नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी गुरुवारी दिली.
कोविड-19 लसीकरण मोहिमेची सुरूवात शनिवारी सकाळी 10:30 वाजता महानगरपालिकेच्या पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ तसेच विविध पक्षांचे गटनेते, नगरसेवक आदी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
महानगरपालिकेकडून करोनाच्या लसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वाय.सी.एम.रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय अशी 8 लसीकरण केंद्रे निश्चित केली आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवा देणारे नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे. 17 हजार 792 आरोग्य सेवा देणाऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. तर, लसीचे 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत.