पिंपरी, (प्रतिनिधी) – थेरगाव येथील आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या तरुणीच्या पुढाकाराने आईच्या केसात अनेक वर्षे असलेली जट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी काढली आहे. त्यामुळे आठ वर्षे जोपासलेली जट काढल्यानंतर त्या महिलेच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.
अॅड. मनीषा महाजन, क्रांती पोतदार, विकास सूर्यवंशी, गणेश तामचिकर, संजय निकम, सायली पांचाळ या कार्यकर्त्यांनी जट निर्मूलनासाठी पुढाकार घेतल्याची माहिती विशाल विमल, विकास सूर्यवंशी यांनी दिली. केसांमध्ये अस्वच्छता, केसांची निगा न राखणे, केसांमधला गुंता वेळच्या वेळी न काढणे, नीट वेणी फणी न करणे या कारणांनी केसांमध्ये जट होते.
समाजात खूप सार्या महिलांच्या केसांमध्ये जट असते. मात्र केसांमध्ये जट झाल्यास त्याला चुकीचा समज करून घेतला आहे. जट कापली तर देवाचा कोप होईल, अशी भीती समाजमनात आहे. त्यामुळे जट काढण्यासाठी सदर महिला, तिचे कुटुंबीय पुढाकार घेत नाहीत. मात्र, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या थेरगाव परिसरातील तरुणीने आईची वेदना आणि अवस्था पाहून जट काढण्यासाठी पुढाकार घेतला.
महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. कार्यकर्त्यांनी महिला आणि कुटुंबीयांशी चर्चा करून, समुपदेशन करून त्यांच्या मनातल्या शंकांचे निरसन केले. सदर महिलेची पूर्वी २००७ साली जट कापली होती. पुन्हा २०१६ सालापासून नवीन जट तयार झाली. त्यामुळे महिलेचे जगणे मुश्कील झाले होते. ती जट कार्यकर्त्यांनी हळूवारपणे काढल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.