पुणे -एसटीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती पाठोपाठ आता शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचारी संपावर असताना एसटीची सेवा पूर्ववत करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे.
महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मागील 100 पेक्षा अधिक दिवसांपासून सुरू असणाऱ्या संपात प्रशासकीय आणि कार्यशाळेतील विभागातील कर्मचाऱ्यांसह हजारो चालक-वाहक सहभागी झाले आहे. परिणामी, एसटीची सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.
ही सेवा पूर्ववत करण्यासाठी महामंडळाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय महामंडळाने कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम देत, कारवाई देखील केली आहे. मात्र, अद्यापही रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्पच आहे. त्यामुळे महामंडळाने कंत्राटी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती आदी मार्गांचा अवलंब केला आहे.
आता, महामंडळाच्या पुणे विभागात आता शिकाऊ उमेदवारांची देखील भरती करण्यात येणार आहे. यासाठीची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या, सुरू असणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर शिकाऊ उमेदवारांची भरती महत्त्वाची ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.