नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून देशातील करोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घातली होती. त्यामुळे देशभरातील करोनाचे सर्व निर्बंध सरकारकडून काढून घेण्यात आले होते. मात्र याचा फटका देशातील शाळांमध्ये होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत करोनाचे 1,007 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिल्ली-एनसीआरच्या शाळांमध्ये करोनाचा स्फोट झाला असून एनसीआरच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या 72 तासांत करोनाचे 35 रुग्ण आढळले आहेत. बुधवारी गाझियाबाद आणि नोएडाच्या शाळांमध्ये करोनाचे 12 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
देशात विद्यार्थी आणि शिक्षकांना करोनाची लागण होण्याची प्रकरणे सरकारची काळजी वाढवत आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्य विभागाने नोएडा आणि गाझियाबादमधील शाळांमध्ये आणखी 12 नवीन करोना प्रकरणांची पुष्टी केली असून, गेल्या 72 तासांत एनसीआर जिल्ह्यातील एकूण प्रकरणांची संख्या 35 झाली आहे.
घरी आणखी विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा केला जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. इतकेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आहेत, परंतु त्यांची करोना चाचणी झालेली नाही.
एनसीआरच्या शाळांमध्ये सोमवारपासून आतापर्यंत करोनाची 35 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. नोएडामध्ये 24 विद्यार्थी आणि तीन शिक्षकांसह 27 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचवेळी गाझियाबादमधून आठ जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सात विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. त्यामुळे आता देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.